“बदल- अपरिहार्यता कि स्विकार्हरता”-भाग-१

“बदल- अपरिहार्यता कि स्विकार्हरता”-भाग-१

काल सकाळी उठतानाच तीन मला गाठलं ! तसा तीन चार दिवसांपासून मी, तिच्या पासून लांब पळत होतो, तिला टाळता येत नसलं तरी, ती खरंच नको होती. कारण ती येणार,बिलगून बसणार, मग तिला कुरवळावं लागणार, तिचे चोचले पुरवावे लागणार, अटेन्शन द्यावं लागणार, ह्या सगळ्या पेक्षा तिला योग्य अंतरावर ठेवणेच योग्य असं वाटत होत. पण काल ती आलीच…! सकाळचा गजर झाला, रात्रीची सगळी स्वप्न, हांथरुण गोळा करताना, शोधत होतो. तेव्हा ती दिसली आणि मी हार मानलीच. तिच्या त्या घट्ट मिठीने, एकदम कडक ! शिंक आली. गुलाबी, रेशमी थन्डीची अवखळ मैत्रीण “सर्दी”, सुद्धा मला पुन्हा एकदा भेटली. आता मात्र ऑफिस मध्ये मेसेज केला की मला यायला वेळ लागेल कारण कुणाला तरी घेऊन बाहेर जाऊन जायचं आहे.

तिला तो स्पिरिट चा गंध बाकी फार आवडतो, इंजेक्शन ची सुई मला टोचते पण आनंद हिला होतो. मग डॉक्टर माझी अजात शत्रू असणाऱ्या “विश्रांतीला” भेटण्याचा सल्ला देऊ लागतात आणि मग मला समजत कि हाच तो क्षण, हीच ती वेळ जिथं आपण निघावं. तिथून तडक हिला घेऊनच मी ऑफिस ला निघालो.

जाताना मनात अनेक विचार गर्दी करून रांगेत उभे होते आणि सोबत हि सर्दी. ती अशी कधीतरी,अचानक येऊन एक मात्र जाणीव करून देते कि आपलं शरीर हि थकत. हि जाणीव होताच, आपल्या वर हि नियंत्रण ठेवणारा, निसर्ग ,म्हणून कुणी तरी आहे हे समजत ! त्या साठी मात्र तिचे धन्यवाद….!

ऑफिस ला पोहोचलो आणि काम सुरु झालं, थोड्या वेळांन जयदीप म्हणाला सर माणसानं आठवड्यातून दोनदिवस तरी सुट्टी घेतली पाहिजे. ” जरा बदल पाहिजे ना…!” तसा तो मस्करीत म्हणाला होता, पण बऱ्याच दिवसात “बदल” ह्या शब्दाचे “बादल” आमच्या मनाच्या अवकाशात अगदी दबा धरूनच बसले होते. झालं! हे निमित्त त्यांच्या विचारधारा करायला पुरेसं होत आणि मग आज कीबोर्ड वर प्रेम उफाळून आलंच!!

बदल तीनच अक्षरं पण खरच आयुष्यं ह्या भोवतीच घुटमळत असतं. आज त्या बद्दलच थोडं ! मला हा बदल दोन वेगळ्या वेगळ्या अनुषन्गाने इथे अभिप्रेत आहे. पहिला बदल एक सुट्टी, थोडी विश्रांती किंवा एखाद नवीन हॉटेल, चवीत बदल म्हणून जस कि , “जस्ट फॉर चेंज”, आणि दुसरा बदल माणूस म्हणून आपल्यात कराव्या लागणाऱ्या सुधारणा….. म्हणजेच “दि चेंज” , “ट्रान्सफॉर्मेशन “!

खरं बघितलं तर बदल हा निसर्गाचा एक अलिखित पण अपरिहार्य नियमच !

मोहरणारा वेल, पिकणारा फणस, गाणारा कोकीळ, नाचणारा मोर, पहिल्या पावसानंतर दिसणारी हिरवळ, झडणारी पानं, सुकणारी फुलं, दिवस आणि रात्री मधला सोनेरी संधीकाळ, दरवर्षी आमच्या वर्गात बदलणारे चेहरे, पिकणारे केस, म्हातारपणीच्या सुरकुत्या हे सगळं काही बदल हा एकच शब्द अधोरेखित करणाऱ्या एखाद्या दूता सारखे असतात. सुरवंट चे फुलपाखरू होणं हि तर मला सगळ्यात अदभूत घटना वाटते.  बदल होतोचं फक्त तो समजला की नाही आणि स्वीकारला कि नाही इतकाच प्रश्न.

लहान असताना शाळेत शारीरिक शिक्षण च्या तासाला १५ कृती नंतर प्रकार बदल असं म्हटलं जायचं. घोषात प्रत्येक वाद्याच्या रचनेनंतर घोष दण्डाच्या संकेतानुसार रचना बदलली जायची. शाळेत वर्ग बदलायचे, कपडे किंवा बूट, चप्पल लहान होऊ लागले ते हि बदलत असत. पेन्सिल चं शाई पेन, शाई पेनाचं बॉल पेन, हा हि एक बदलच. अगदी लहान असताना आपल्याला जे आवडायचं ते आज आवडतच असं नाही, विचार करण्याची पद्धत वेळेनुसार बदलत जाते.

काहींचे प्रोजेक्ट बदलतात, काहींच्या नोकऱ्या बदलतात…!

काहींच्या स्टोरी बदलतात, काहींच्या छोकऱ्या बदलतात…!

काहींच्या सवयी बदलतात ,काहींच्या खोड्या बदलतात..!

काहींची घर बदलतात, काहींच्या गाड्या बदलतात…..!

सगळं , सगळं बदलत असतं

कधी पुढं कधी मग जात असतं….! बदल होणारच मग तो forcibly का foreseeably इतकाच काय तो फरक !

स्वातंत्र्यवीर सावरकर एका ठिकाणी म्हणाले होते कि उत्क्रांती शिवाय क्रांती नाही. हे दोन शब्द मी इंग्लिश मध्ये आहे असे शोधण्याचा प्रयत्न केला तर ते निघाले अनुक्रमे evolution आणि revolution , सत्ता बदल होण्या आधी समाजात वैचारिक बदल झाले पाहिजेत असच काहीस आहे ते.

अर्थातच मी दोन्ही बदलांच्या प्रकारांना स्वतंत्र पणे स्पर्श करणारे…कारण खूप मोठा ब्लॉग लिहिला कि वाचक तितका वेळ संयम ठेवत नाही हे एव्हाना मला कळलं आहे. हा ही एक बदलच ‘पिढी’ मधला….! बघा कि पूर्वीची पिढी एकाच बुकात अनेक पेजेस वाचून एकचं विषय समजून घ्यायची आणि आपण अनेक विषय एकाचं फेसबुक पेज वर वाचतो किंवा स्कीम करतो आणि पुढं जातो. हा जसा तंत्रद्यानातला बदल आहे तसा concentration लेव्हल मधला पण बदल आहे.

तर मग भेटूचं “बदल- अपरिहार्यता कि स्विकार्हरता”- भाग-२ आणि भाग ३ मध्ये…!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s