“प्रत्येकाच्या वाटयाला एक दुःखाचा आणि आनंदाचा ठराविक कोटा असतो. त्यातला दुःखाचा कोटा लवकरात लवकर सपंवुन टाकावा म्हणजे मग उरतो तो फक्त आनंदच आनंद….!”
जगाला हसवायचं व्रत घेऊन आलेल्या एका स्वर्गीय गंधर्वाचा आयुष्या बद्दलचा दृष्टीकोन. माझ्या साठी हा सिनेमा नव्हताच. मला आज दिवाळी साजरी केल्याचं फिलिंग आलं. मला पु. ल. भेटले नसते तर मी आज जसा आहे, तसा नसतो. माझ्या साठी पु.लं. हे फक्त लेखक असूच शकत नाहीत. तत्वज्ञानाला हास्याची भरजरी झालरं लावून, ते जगासमोर मांडणारे ते एकटेच असतील आणि राहतील. हसून हसून डोळ्यात पाणी आलेलं असताना अचानक एखाद वाक्य, पाणवलेल्या डोळ्यात अंजन घालतं तेव्हा लिखाणातला सहजपणा कसा सजगपणा आहे ते कळतं.
लहानपणी, सुट्टीत सोलापूर ला राहायला जायचो. तेव्हा आज्जी पुस्तकं वाचायला द्यायची. अगदी खरं सांगायचं तर सुरुवातीला ते नको वाटायचं. बाहेर बोंबलतं फिरणं ह्या शिवाय जगात काही असतं ह्यावर माझा विश्वास च नव्हता त्या काळात. उगार ला असलं की पोहायला, चाळीत खेळायला किंवा ऊस अड्ड्यात ऊस तोडायला जाणं हि खरी आवड. मिरजेत सायकल वर टांग मारून गावभर फिरणं ह्या सारखं सुख नव्हतं. सगळ्या आणि सगळ्यांच्या बातम्या इत्यनभूत माहिती असणारा माझ्या वयाचा दुसरा तुम्हाला चुकूनही सापडला नसता. अश्यात सोलापूर ला गेलं की आजीची ती कडक शिस्त थोडं दडपण निर्माण करायची. पण अगदी अन्नपूर्णे सारखी प्रेमळ काकू आणि बिन्दास्त, स्पष्टवक्ता आणि प्रचंड जिव्हाळा असलेले काका ह्याची ओढ आजीच्या शिस्तीवर मात करायची. त्यात भरीस भर म्हणून सश्या सारखा गोंडस, शिंकला तरी लालबुंद होईल असा पण तितकाच संवदेनशील प्रणवभाऊ त्याच्या सोबत राहायला भाग पाडायचा. अहमदाबाद हुन आलेली धाकटी बहीण आणि प्रचंड लाड करणारे मोठे काका हेही तस आकर्षणच. बारा लोक बदाम सात खेळायची मज्जा त्यांनतर कित्येक वर्षात आलेली नाही. एकंदरीतच आयुष्यातल्या चार पाच सुट्ट्या खूप आठवणी देऊन गेल्या.
सहावीतुन सातवीत जायच्या सुट्टीत, एक दिवस दुपारी जेवणा नंतर आजीने बोलावून घेतलं. आता काय फर्मान निघतं? अशी भीती पोटात गोळा उठवत होतीच, तिच्या खोलीत पळत जायला फारसा वेळ लागला नाही. आत गेल्या गेल्या तीनं एक लाल, बायंडिंग कव्हर, असलेलं भलं मोठं पुस्तकं दिलं आणि ह्या सुट्टी मध्ये हे वाचून संपलं पाहिजे असं सांगितलं. प्रचंड दुःख उरात बाळगून मी ते हातात धरलं. “ठीक आहे!” अस मना विरोधात जाऊन म्हंटलं आणि बाहेर आलो. हॉल मध्ये आजोबा माझ्या कडे बघून हसले आणि त्यांनी , “हा चालू करा” असं म्हणल्यावर मला अजून दुःख झालं. कारण माझी अवस्था त्यांना कळून ही ते मला मदत करीत नाहीत हि खन्त मला जास्त टोचत होती. शेवटीं तोंडाचा चंबू करून मी ते पुस्तक उघडलं आणि त्याच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, “श्रीमान योगी”!
आयुष्य बदलवणारा तो क्षण आहे हे तेव्हा मला कळालं नाही. मला त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काही तरी नवीन भेटलं. “शिवाजी” ही तीन अक्षरं ह्र्दय आणि बुद्धी वर गोंदवायचं काम त्या पुस्तकानं पार पाडलं. ते पुस्तक चार दिवसात वाचून संपलं, पण वाचन अजूनही चालूच आहे. त्या पुस्तकानं मला, वाचायला शिकवलं आणि हे त्या आजीमूळ घडलं. तीनं त्या दिवशी ते पुस्तकं हातात दिलं नसतं तर मी कदाचित फार मोठं काही तरी गमावलं असतं.
त्याच्या पुढल्या सुट्टीत संघ कार्यालयात एक कपाटभरून पुस्तकं असल्याचं मला कळालं. मी थेट आमच्या आशिष गोसावींना गाठलं आणि आम्ही दोघांनी हेमंत ला बरोबर घेऊन तिथंच एक वाचनालय थाटलं. पुस्तकं वर्गिकृत केली, रजिस्टर तयार केलं आणि वाचन चालू झालं. साधारण सहा महिने मी त्यातून पुस्तकं वाचत होतो. पेशवाई, राजाशिवछत्रपती, माझी जन्मठेप, “हू वेअर शूद्राज?” च मराठी भाषांतर पण त्यात असल्याचं मला आठवतं. त्या काळात मी प्रचंड वाचन केलं आणि त्याची टिप्पण हि काढून ठेवली. आशिष शिक्षकांनी दिलेलं व्हिजन २०२० आज हि माझ्या कपाटात आहे.
पुढं इयत्ता नववी मध्ये मी असताना श्री. ताम्हनकर सरांच्या बोलण्यात “पु.लं.देशपांडे” हे नाव ऐकलं त्या बद्दल शोधलं आणि मग मीरा मामीच्या खरे मंदीर वाचनालयाच्या कार्डवर “व्यक्ती आणि वल्ली ” काढून आणलं. तिनं मला फक्त कार्ड दिलं नव्हतं ते माझ्या साहित्य प्रवासाचं तिकीट होतं. मला इथं “पु. लं.” सापडले आणि मग मात्र मी त्यांना घट्ट धरूनच ठेवलं. जे जे मिळालं ते वाचलं, ऐकलं. पुढं युट्युब वर ही बरीच साधनं मिळाली. जितकं वाचाल, तितकं गुंतूत जालं. जणू ती एक चुंबकीय शक्ती आहे. पुढं त्याची धुंदीच चढली आणि आता ती कधीच उतरू नये असं वाटतं.
वर्गात शिकवताना मी सतत विनोद करत राहतो कारण, हसणारी आणि शिकणारी मुलं जेव्हा एकरूप होतात तेव्हा भगवंत भेटल्याचा भास होतो. आशीर्वाद मिळाल्या गत वाटतं. माझ्या कडे आज जी काय थोडी फार विनोद बुद्धी आहे ती पु. लं ची देण. यशस्वी झालं नाही तरी एक वेळ चालेलं, पण आनंदी झालं पाहिजे ही भाईंची खरी शिकवणं. आयुष्याचा क्षण आणि क्षण, सुख-दुःखाचा कण आणि कण आनंदानं भरभरून टाकण्याची ईच्छा निर्माण करणारा हा अवलिया. हरितात्यांची काक दृष्टी, अंतू शेठ चं जीवनाचं मार्मिक तत्वज्ञान, चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला आणि विद्यादानाचं व्रत, नाथाकामतांचा रंगेल पणा, नारायणाची इतरांना मदत करण्याची वृत्ती, रावसाहेबांचा निरागस आपलेपणा, घर बांधताना ते बळजबरीनं दाखवणारा पु. लं. चा अजात शत्रू हे सगळे जण आयुष्य कडे बघण्याचा एक जबरदस्त सकारात्मक दृष्टिकोन देतात. जखमी म्हैस काय काय दाखवून गेली त्यांना? निरीक्षण आणि त्याची ताकद इथे पुन्हा पुन्हा अधोरेखीत होते. जन्म आणि मृत्यू ह्या प्रवासामध्ये पैसा, घर, गाड्या आणि इतर अनेक भौतिक गोष्टीं महत्वाच्या नसून आपल्याला भेटणारी माणसं आणि त्यांचा-आपला स्नेह हेच काय तो महत्वाचा टेकअवे आहे हे सांगूनच जणू भाई निघून गेलेत, फक्त शरीरानं …!
महेश मांजरेकरांनी एक उत्तम कलाकृती दिली आहे. भाई जितक्या पटकन समजतात, भावतात तितक्या लगेच सुनीता बाई भेटत नाहीत. पण ह्या सिनेमानं भाईंच्या आयुष्यातलं सुनीताबाईंचं स्थान खूप सुंदर रित्या रेखाटलं आहे. जगातल्या प्रत्येक पुरुषोत्तमाला ,लक्ष्मणा सारखे पिता मिळावेत असंही वाटून जातं. आपल्या सारखेच सर्वसामान्य वाटणारे भाई, नक्की कसे वेगळे होते ते अतिशय नीटनेटके पणे मांडलं आहे. पंडित वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी , पंडित कुमार गन्धर्व, जब्बार पटेल, बा. सी. मर्ढेकर, गदिमां ही सगळी माणसं भाई ह्या धाग्यानं गुंतली गेलीयत आणि त्यांना एकत्र बघणं म्हणजे एक संधीच आहे. भाई आणि सुनीता बाईंचं झालेलं लग्न ज्या प्रकारे झाल्याचं दाखवलं आहे तो म्हणजे तर आपल्या पिढीनं शिकण्या सारखा प्रसंग आहे.
पुस्तकात भाई दिसतात, सिनेमात भाई भेटतील !
सिनेमा जरूर बघा !
Khup Sundar lihilayas…
LikeLiked by 1 person
खुप सुंदर सर
LikeLike