(सदरची कथा पूर्ण पणे काल्पनिक असून तिचा कुठल्या हि घटना किंवा व्यक्तीशी संबध आल्यास तो फक्त योगायोग समजावा. लेखक त्याच्या लिखाणाची पूर्ण जबाबदारी घेतोय, पण तुमच्या आकलनाची जबाबदारी तुमची राहील. “कथा पांडू आणि बंडूची भाग-१ “, वाचून हे वाचल्यास विषय सविस्तर कळेल.)
एक आट्पाट नगर होतं. प्राणि म्हणुन न जगता माणुस म्हणुन जगायला शिकणं जेव्हा सुरु झालं असेल त्या वेळच एक समकालीन शहर वजा खेड. इथे आज संध्याकाळच्या वेळी एक पंचायत बसली आहे. कसला तरी एक महत्वाचा प्रश्न सोडवण हा आजचा मुख्य विषय.
मानवी संस्कृतीची चाहुल नुकतीच लागली आणि सोयीसुविधांच पाऊल हळुहळू पडू लागलं. मग नियम बनू लागले. जगणं अधिकाधिक स्टँडर्ड करायचा प्रयत्न होऊ लागला अश्या आधुनिक युगामधलं हे गाव तस भरलेल,गजबजलेल. साधनं उपयुक्त पध्दतीन वापरता न येणं किंवा तेच शिकण सुरु होत.
आज प्रश्न पाण्याचा होता. गावात दोन खुप मोठ्या विहिरी होत्या. असं कुणी तरी ठरवून दिल होत की एक विहिरीतुन पिण्यासाठी उपसा करायचा आणी दुसर्या मधून इतर कामासाठी. ही दुसरी विहिर जरा जास्त क्षार युक्त तेव्हा पाणी पिण्यास आयोग्य. आता कित्येंक पिढ्या, ह्या एकाच विहिरीमधलं पाणी पीत आल्या होत्या. पण गेल्या ३-४ वर्षा पासुन विहिरी ची पाणी पातळी खालावत निघाली होती. आणी ह्या वर्षी कधी नव्हे इतकी पातळी खालावत गेली ज्यामुळं सर्वत्र भीतीच वातावरण तयार झालं. बरेच पर्याय शोधले गेले, पण चर्चे अंती सर्वमते असं ठरलं की गावापासून बरंच अंतर असणाऱ्या नदी मधून पाणी आणलं जाईल आणि ते विहिरीत टाकलं जाईल. साधनांची कमतरता असल्यानं कुणीतरी बादल्या-बादल्या भरून ते आणलं पाहीजे हे निश्चित झालं. तसेच हे सर्व काम पंचायती ने करावं आणि नागरिकांनी कर द्यावा असं ही ठरलं. आजची बैठक बराच वेळ चालली आणी अगदी सारा गावं जमला होता. तेव्हा तशी ती सविस्तर ही झाली. असंख्य नागरिकांना बरोबर दोन होतकरू, उमदे, चाणाक्ष, धाडसी तरुण ही तिथं उपस्थित होते. दोघे लहान पणा पासून चे मित्र, यार ! एकाच नाव पांडू आणि दुसरा बंडू.
सगळी मिटिंग सपंवुन अनेक लोक अनेक टेक अवेज घेऊन परत निघाले. कुणी निराशा, कुणी चिंता, कुणी प्रश्न मार्गी लागेल अशी आशा, कुणी कुरकुर, पण हि दोघे मात्र काही तरी शोधत होती. त्यांना दिसत होती संधी. कामाची, स्वप्नं पूर्ण करण्याची. एका ठिकाणी दोघेही पोहोचले, अगदी त्यांचा अड्डाच तो. आणि न राहवून पांडू ने विषय काढलाच. चर्चे अंती हे काम करायचं असं ठरलं आणि जोडगोळी कामाला लागली.
दुसऱ्या दिवशी पंचायतीतील लोकांशी भेटी गाठी झाल्या आणि पुढल्या काही दिवसात ह्यांना व इतर दोघा-तिघांना काम मिळालं सुद्धा. पठयाना हुरुप चढला. सकाळी लवकर उठून कामाला जाणं, सूर्य डोक्यावर येण्या आधी काम पूर्ण करणं असा दिनक्रम सुरु झाला. फक्त पैश्या साठी नव्हे पण गावासाठी हि लोक काम करतात अशी धारणा तयार झाली, त्यामुळे गावात मान मिळू लागला. अगदी आयुष्य सेट झाल्या सारखं काहीस फिलिंग निर्माण झालं. रात्री पार्ट्या चालू झाल्या. छान छान कपडे येऊ लागले, जे जे वाट्लं होत ते सगळ सुख ह्यांच्या अपेक्षांच्या विहिरीवर पाणी भरू लागलं.
बघता बघता तीन चार महिने असेच निघून गेले. आणि पांडू कसल्या तरी विचाराने अस्वस्थ झाला. आयुष्य असंच पाणी भरून जाणार का? हा एक साधा पण तितकाच गंभीर प्रश्न पांडू ला स्वस्थ बसू देईना. त्याने आपली अस्वस्थता बंडू ला बोलून दाखवली. पण बंडू एव्हाना एका कंफर्ट झोन मध्ये पोहोचला होता. जे चाललंय ते च छान आहे. हाच आयुष्याचा अर्थ आहे. हे सोडलं तर परत नवीन काय शोधायचं? कशावरून आहे त्या पेक्षा चांगलं काही तरी मिळेल? अश्या बऱ्याच युक्तीवादाने बंडू पांडू ला समजावत असायचा. पण पांडू आयुष्यावर नाराज होता. आपण ह्याच्यासाठी बनलो नाही आहोत हे तो स्वतःला समजावण्यात यशस्वी झाला होता. आणि तो ते बंडू ला ही सांगायचा प्रयत्न होता. एके दिवशी बंडू कडे पार्टी सुरु होती आणि पांडू एकटाच कसल्या तरी विचारात होता. एक कागद पेन घेऊन पांडू काही तरी काम करीत होता. कसलीशी गणित मांडीत होता. बंडू तिकडे गेला आणि नक्की काय चाललं आहे ते त्यानं बघितलं. पांडू ने त्याला एक सविस्तर योजना सांगितली. आणि पांडू ने बंडूला त्याच मत विचारलं. बंडू थोडासा गोंधळला होता. त्याने दुसऱ्या दिवशी सांगतो असं सांगितलं.
भल्या पहाटे पांडू प्रचंड अपेक्षा घेऊन बंडू कडे गेला. तिथून दोघेही कामाला जायला निघाले. खूप वेळ वाट बघून न राहावुन पांडू न विषय छेडला पण बंडू दिवसभर तो विषय टाळत राहीला. दोन दिवस गेले, तीन दिवस गेले,तरीही बंडूचा काहीच रिप्लाय नाही. सरते शेवटी एक आठवड्याने बंडूने पांडूला सांगितलं कि “मला तू म्हणतो आहेस त्यात गट फिलिंग नाहीय. मला नकोय इंसेक्युरिटी. मला रिस्क नकोय. आणि कृपया परत हा विषय पण नको.”
पांडू, थोडा निराश झाला, हताश झाला पण त्यानं ठरवल होतं. त्याला भविष्य दिसत होत. तो, जे बघू शकतं होता ते कुणालाच दिसत नव्हतं. बंडूला कळतं होत पण वळतं नव्हतं. आणि बंडू जिथं स्वतःवर विश्वास ठेऊ शकत नव्हता तिथं तो पांडू वर विश्वास काय ठेवणार? पांडूचा मात्र निर्धार झाला होता. काहीच दिवसात तो फक्त निम्मं काम करू लागला. मधूनच कामावरून गायब होऊ लागला. रात्रीच्या पार्ट्या बंद झाल्या. मित्र परिवारातला वावर कमी झाला. तो एकटा होता. हातात कसलीशी कागद अवजारं घेऊन तो फिरायचा. कामावर कमी काम केल्यानं त्याला पैसे कमी मिळू लागले. लोक खुळ्यात काढू लागली. माघारी काय वाट्टेल ते बोलू लागली. अवहेलना, थट्टा, कुचेष्टा हे सगळं त्याच्या वाट्याला येऊ लागलं. पण पांडू साठी तो साक्षात्काराचा काळ होता. ” एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले……”, अशीच पांडूची अवस्था होती. जग काय बोलतं ह्या पेक्षा पांडुच लक्ष त्याच्या ध्येया वर होतं. अनंत अडचणी पार करून तो एकटा पुढं निघाला होता. कारण पुढं जाणं आणि ध्येयं गाठणं ह्यातला फरक त्याला कळाला होता.
साधरणतः सहा आठ महिन्याचा तो काळ, एकदा दोनदा पैसे कमी पडले म्हणून तो बंडू कडून तो घेऊन ही गेला. बंडू ही पांडूच्या काळजीत होता. पण आता कंटाळू लागला होता. तेच तेच करून त्याला ही उबग येऊ लागला होता. एकी कडे त्याला पांडू ची धडपड दिसत होती. तर दुसरी कडे त्यांच्या सारखे काम करणारे इतर लोकं ही होते जे पांडूची चेष्टा करत होते. बंडू अजूनही त्याचं सेक्युर आयुष्यात मग्न होता. तितक्यातच पांडू ने पंचायतीत जाऊन तो हे पाणी भरायचं काम सोडतो आहे असं सांगितलं. बंडू अवाक झाला. पांडू ची चेष्टा करणारे लोकं त्याला वेडा ठरवून मोकळे झाले. बंडू ला हे कळता क्षणीच त्याने पांडू कडे धाव घेतली आणि हे काय आहे जाणून घेण्याची ईच्छा व्यक्त केली. पांडू म्हणाला फक्त चार दिवस थांब. सगळं कळेल.
तिसऱ्या दिवशीच गावात एक जाहीर निमंत्रण दिल जाऊ लागलं. गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कसलासा कार्यक्रम होणार असल्याची दंवडी पिटवली जात होती. निमंत्रण पत्रिका वाटल्या जात होत्या. हे सगळं होतं पांडूच्या पाणी वाहून नेणाऱ्या पाईप लाईनच उदघाटन. सोहळ्याचा दिवस उजाडला संपूर्ण पंचक्रोशीन पांडू ची वाहवा केली. आणि आता हि पाइपलीन इतरांच्या तुलनेत दसपट पाणी वाहून नेऊ लागली. पांडूचे दिवस अचानक पालटले. जितके महिने पांडू कमी पैश्यावर जगत होता ते सगळं अगदी एका महिन्यात भरून निघालं होत.
पांडूला खुळ्यात काढणारे एव्हाना कुठे दिसेनासे झाले होते. काहींनी सपशेल शरणागती पत्करली आणि पांडूने आपल्याला विचारूनच हे सगळं केलं अशी सांगायला सुरुवात केली होती. पांडू आनंदी होता कारण त्यानं फक्त एक पाणी वाहून नेणारी पाईपलाईन बांधली नव्हती. तो भविष्यातील यशाचा राजमार्ग होता. पांडू कड बघून खूप लोक तस करायचा विचार करू लागले पण आता पांडू इतरांच्या खूप पुढं होता. त्याची मैत्री आता कष्ट, अवहेलना, संघर्ष ह्यांच्याशी झाली होती. त्यांची खूप मदत झाल्यानं पांडू तावून सुलाखून निघाला होता. अनुभव नावाच्या गुरुन पांडूला समृद्ध केलं होत. त्यामुळं पांडूला स्पर्धेची भीती उरली नव्हती की अपयशी होण्याचा विचार त्याच्या आसपासही फिरकत नव्हता.
आज पांडू कडे पार्टी होती आणि बंडू निमंत्रित होता. पुन्हा एकदा पांडू एक कागद घेऊन बंडू कडे आला आणि कसलीशी एक योजना बंडूला सांगू लागला. ह्या वेळी बंडू अधिक जबाबदारीनं ते ऐकत होता.
पुढं पांडू आणि बंडू च काय झालं ते ऐकायला आपल्याला थोडं थांबावं लागेल वाट बघावी लागेल.
मी आधीच सांगितल्या गत प्रश्न पडेल आणि प्रत्येकाला म्हणावं वाटेल “मी आहे पांडू आणि बंडू कोण? तुचं…..! तुचं …… !
पण हि फक्त कथा आहे तुमची माझी व्यथा नाही.
कारण पांडू स्वयंभू असतात सूर्या सारखे आणि बंडू चंद्रा सारखे सूर्याचा उजेड परावर्तित करणारे. पण दोघांनाही तितकंच महत्व आहे आणि असेलं. पण बाकीच्यांना अस्तित्व नव्हतं आणि नसेल. कारण गर्दीत फक्त माणसं असतात चेहरे किंवा ओळख नाही.