फेसबुक वर ना का बदललं ?
फक्त प्रसन्न संजीव हे काय नविन ??
मला वाटत उत्तर देण्याची वेळ आलीय. वि वा शिरवाडकरांची एक छान कविता आहे. लढवय्या मराठयां साठी !!! कवितेचं नाव आहे ” निर्धार” .
त्यांना अपेक्षित असलेला मराठा म्हणजे छत्रपतींचा प्रत्येक मावळा आहे. मृत्यू समोर असून ही प्रति शिवाजी म्हणून शत्रू कडे गेलेला शिवा काशीद हा शत्रू साठी मराठा होता. बारा बंदी रक्तानं भरलेली असताना माझा राजा गडावर पोहचे पर्यंत मी जीव सोडणार नाही म्हणणारा बाजी प्रभू शत्रू साठी मराठा होता. मदारी मेहतर शत्रू साठी मराठा होता. कवी कलश शत्रू साठी मराठा होता. दिल्लीला भीती घालणारा बाजीराव उत्तरेत मराठा होता. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारा दत्ताजी मराठा होता. पानिपतात अब्दालीला घाम फोडणारा प्रत्येक मावळा अब्दाली साठी मराठा होता. (लक्षात घ्या पानिपत नंतर एकही हल्ला वायव्येतून झाला नाही पण दहाच वर्षात सयाजी शिंदे दिल्ली चालवत होते.) )
१९६१ साली , मा. यशवंत राव जेव्हा युद्ध भूमीवर पोहोचले तेव्हा हर हर महादेव ची घोषणा देणारा प्रत्येक जवान मराठा होता. अश्या ह्या मावळ्यांचं वर्णन करणारी हि कविता.
समर भूमीचे सनदी मालक शत युधांचे मानकरी
रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी घोरपडीला दोर लाउनी पहाड दुर्घट चढलेले
तुटून पडता मस्तक खाली धुंद धडा ने लढलेले
खंद्कातल्या आंगारावर हासत खेळत पडलेले
बाप असे कळी काळ ज्यांचा कीर्त गाजली दिगंतरी !!रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी…….
सन १६४५: छत्रपती शिवाजी, स्वराज्य स्थपनेचा संकल्प !! पुढला सगळा सुवर्ण इतिहास
सन १८५७, मंगल पांडे शाहिद : क्रांती : सम्पूर्ण देश एकजूट
सन १९०० च्या अलीकडं पलीकडं दोन आघाड्यां वर लढा, नंबर एक ब्रिटिश , नंबर दोन वर्णभेद.
ह्या जाती पातीच्या लढ्यात नेतृत्व केलं महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, छत्रपती शाहू महाराज, पूजनीय डॉ. बाबा साहेब आंबेडकर , स्वा.सावरकर.
देश स्वतंत्र झाला, १९४८ साली पहिला भडका उडाला जाळपोळीच्या निमित्त्यानं आणि गेल्या शतकांत ह्या सगळ्या लोकांनी मिळून जे एकजूट करण्याचा प्रयत्न केला त्याची अदोगती सुरु झाली. इतकंच होत ह्या वेळी रेषा ऋणा कडे न जाता उलटी कडे निघाली होती.
आम्ही ह्या जातीचे आम्ही त्या आमच्यात असं तुमच्यात तसं ! अरे तू बामनाचा ना मग मटण खातोस….. ते मराठे लई तापट असतात ….. आणि खूप काही कशा साठी माहित नाही??
आणि ह्या नाजूक काळात नेतृत्व कोना कडे हे आता लिहायची गरज नाही. त्यात परीपाक झाला जेव्हा बी ग्रेड आणि सी ग्रेड स्वतःच्या सडक्या बुद्धीनं थर्ड ग्रेड लिखाण चालू केलं. ते थांबलंय असं नाहीय, पण थांबेल. आपलंच बाळ आपल्या मांडीवर हगल्यावर मांडी कापू नये, बाळाला संडास करायला योग्य जागा दाखवावी.
इतकंच म्हणणं आहे आपण आपल्या प्रतिभेला प्रगल्भतेची जोड दिली पाहिजे. जात पात विसरून देश म्हणून पुढं आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण समाज म्हणून एकत्र आलोय तेव्हा आपण काही तरी अद्वितीय केलंय. वेळ आलीय पुन्हा एकत्र होण्याची , आपल्या नेतृत्वाला आपल्या सजगतेच्या जाणीव करून देण्याची. वि. वा. त्याच कवितेंत शेवटी म्हणत आहेत.
भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो (हिमालयाचं वर्णन आहे)
रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो
हे सह्या चल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो
त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आपल्या जळे उरी !!रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी !!
वास्तवात जात विरहित समाज तयार व्हायला वेळ लागेल , लागूदे तो देऊया ही…
पण निदान सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी तरी ती सोडायचा प्रयत्न करूया. फक्त आपलं नाव बदलल्या मूळ बदल होणार असेल तर चला करूया !!!!
शिवाजीचं धर्म व्हावा शिवाजीचं जात,
शिवाजीचं कर्म आणि शिवाजीचं बात !
शिवबाचं आमुचा मंत्र व्हावा, शिवबाचं आमुचे तंत्र
शिवशाही अमुचा ध्यास आणि स्वराज्यच आमुचे गोत्रं !